कमी NAV स्वस्त असते का?
ज्या म्युच्युअल फंड योजनेचे मालमत्ता मुल्य (NAV) कमी असते ती योजना ज्या म्युच्युअल फंड योजनेचे मालमत्ता मुल्य (NAV) जास्त असते त्या योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर होऊ शकते काय? कमी एनएव्ही मुळे जास्त युनीट मिळतात, म्हणून हि योजना स्वस्त नव्हे काय? ज्या म्युच्युअल फंड योजनेचे मालमत्ता मुल्य (NAV) जास्त असते त्या योजनेत गुंतवणूक करणे टाळावे काय?
प्रथमत: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करु इच्छिणा-या गुंतवणूकदाराच्या मनात असे काही प्रश्र्न उद्भवत असतात. खर म्हणजे या प्रश्र्नाचे उत्तर असे आहे कि योजनेचे मालमत्ता मुल्य कमी कि जास्त हा महत्वाचा भाग नसतो कारण तुम्ही गुंतवलेली रक्कम हि काही कमी किंवा जास्त एनएव्हीमुळे बदलत नसते. दोन समान उदिष्ट असणा-या योजना असतील व एका योजनेची एनएव्ही कमी असेल तर तुम्हाला मिळणारे युनीटस् जास्त मिळतील व दुस-या योजनेची एनएव्ही जास्त असेल तर मिळणारे युनीटस् कमी मिळतील. मात्र दोन्ही योजनेत तुम्ही गुंतवलेल्या रकमेचे बाजारमुल्य सारखेच असेल. योजनेची गुंतवणूक कोणकोणत्या समभागात झालेली आहे महत्वाचे असते आणि म्हणून मालमत्ता मुल्य (NAV) हे महत्वाचे नसते. उदा. एकप्रकारच्या दोन योजनांमधून मिळणारे वार्षीक उत्पन्न २५% आहे. पैकी एका योजनेचे गुंतवणूक करताना मालमत्ता मुल्य (NAV) रु.१०/- होते तर एक वर्षानी त्या योजनेचे मालमत्ता मुल्य (NAV) रु.१२.५० इतके होईल व दुस-या योजनेचे मालमत्ता मुल्य (NAV) जर रु.४००/- असेल तर ते रु.५००/- होईल. म्हणजेच गुंतवणूकदाराला मिळणारे वार्षीक उत्पन्नात काहीच फरक नाही. जेव्हा तुम्ही तुमची युनीटस् विकाल तेव्हा दोन्ही योजनेतून मिळणारे पैसेही समानच असतील. थोडक्यात योजनेच्या मालमत्ता मुल्याशी (NAV) मिळणा-या उत्पन्नाशी कोणताही संबंध नसतो. म्हणून गुंतवणूक करताना मालमत्ता मुल्य (NAV) पाहू नये तर योजना कशा प्रकारे चालवली गेली आहे हे पहाणे महत्वाचे असते.
मात्र जर का तुम्ही ग्रोथ च्या ऐवजी डिव्हीडंड पेआऊट म्हणजेच तुमच्या गुंतवणूकीवर तुम्हाला लाभांश मिळावा हा पर्याय गुंतवणूक करताना घेतलेला असेल व दोन्ही योजनानी समान दराने लाभांश दिलेला असेल तर मिळणा-या लाभांशाच्या रकमेत फरक पडेल परंतु लाभांश पश्र्चात असणा-या गुंतवणूक मुल्यामध्ये तसे पाहिल्यास काहिच फरक पडत नाही. या साठी आपण उदाहण घेऊया तुम्ही वर दाखवलेल्या दोन्ही योजनेत प्रत्येकी रु.एक लाख गुंतवले होतेत. पहिल्या योजनेत तुम्हाला १०००००/१० = १०००० युनीटस् मिळाली होती व दुस-या योजनेत तुम्हाला १०००००/४०० = २५० युनीटस् मिळाली होती. एक वर्षानंतर दोन्ही योजनानी ५०% डिव्हीडंड दिला (डिव्हीडंड हा दर्शनी मुल्यावर दिला जात असतो). आता काय होईल? पहिल्या योजनेत तुम्हाला रु.पन्नास हजार लाभांश मिळेल (लाभांश पश्र्चात एनएव्ही रु.५ ने कमी होऊन रु.७.५० होईल व योजनेतील १०००० युनीटस् चे मुल्य असेल १०००० x ७.५० = रु.७५०००/-). आता दुस-या योजनेत मिळणारा डिव्हीडंड असेल रु.१२५०/- (लाभांश पश्र्चात एनएव्ही रु.५ ने कमी होऊन रु.४९५ होईल व योजनेतील २५० युनीटस् चे मुल्य असेल २५० x ४९५ = रु.१२३७५०/-). म्हणजेच पहिल्या योजनेच एकूण मुल्य रु.७५००० + रु.५०००० (मिळालेला लाभांश) = रु.१२५०००/- व दुस-या योजनेचे मुल्य असेल रु.१२३७५०/- + रु.१२५०/- (मिळालेला लाभांश) = रु.१२५०००/-. म्हणजेच येथे सुध्दा एकूण उत्पन्ना खरे पहाता काहीच फरक नाही. म्हणजेच कोणत्याही दृष्टीने पाहिले तरी मालमत्ता मुल्यामुळे (NAV) उत्पन्नात काहीच फरक पडत नाही.
आणि म्हणूच योजनेची कामगिरी तपासणे हेच महत्वाचे असते, त्यासाठी सोपा मार्ग म्हणजे समान कालावधीत एकाच प्रकारच्या योजनानी किती उत्पन्न दिले आहे हे तपासून पहाणे. म्हणजेच गुंतवणूक करताना एकाच प्रकारातील वेगवेगळ्या योजनानी मागील १ वर्षात, २ वर्षात, ३ वर्षात व ५ वर्षात गुंतवणूकीवर किती परतावा दिला आहे हे तपासावे व ज्या योजनेतून सर्वच कालावधीत अधिक उत्पन्न मिळालेले असेल अशाच योजनेची निवड करावी. यासाठी तुम्हाला चांगली मदत करतो तोच चांगला म्युच्युअल फंड वितरक/गुंतवणूक सल्लागार असतो हे लक्षात ठेवा. तो तुमचा परिचीत, मित्र अथवा एकाच गावात रहाणारा आहे कि अपरिचीत व परगावी राहणारा आहे हे महत्वाचे नसते कारण तुम्ही गुंतवत असलेली रक्कम तुमची स्वकमाईची असते व तिच्यावर मिळणारे उत्पन्न हे तुमच्यासाठी सर्वात महत्वाचे असते.