विमा घेणार आहात काय?
माणसाच्या जिवनात अनेक घटना अनिश्र्चितपणे घडतात. त्या कधी घडतील हे कोणीच सांगू शकत नाही. मात्र जर का आपण योग्य वयात, शक्यतो आपला प्रमुख उत्पन्नाचा स्त्रोत सुरु झाल्यावर लगेचच खालील प्रकाचे विमा संरक्षण घेतले तर त्या वेळेला वय कमी असल्यामुळे विम्याचा हप्ता कमी पडतो व उर्वरीत रक्कम आपल्या जोखीम स्विकारण्याच्या तयारी नुसार योग्य त्या गुंतवणूक साधनात नियमीतपणे (शक्यतो दर महा) दिर्घ काळासाठी गुंतवावी म्हणजे जिवनातील कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणे सुलभ होईल.
विमा प्रत्येकानेच खालील प्रमाणे घ्यावा:
१) जिवन विमा: हा टर्म इंशुरन्सचे माध्यमातूनच घ्यावा. ज्याना शक्य आहे त्यानी तो ऑनलाईनच खरेदी करावा ज्यामुळे सर्वात कमी हप्ता भरावा लागतो, कारण यात एजंट नसल्यामुळे त्याच्या कमिशनचा खर्च वाचतो. विमा हा आपल्या वार्षीक उत्पन्नाच्या किमान १० पट घ्यावा. इंशुरन्स कंपनीकडून जेवढे जास्तीत जास्त विमा संरक्षण मिळू शकत असेल तेवढे घ्यावे. विम्याची मुदत जास्तीत जास्त घ्यावी (किमान ३० वर्षे तरी असावी). ३० वर्षाचे व्यक्तीला वार्षीक सरासरी रु.६०००/- हप्ता भरुन रु.५० लाखाचे विमा संरक्षण प्राप्त होते (ऑनलाईन).
२) मेडिक्लेम: प्रत्येकाने हेल्थ इंशुरन्स घेणे अत्यावश्यकच आहे कारण कोणत्या प्रकारचा आजार कधी उद्भवेल हे सांगता येत नाही. साधारणपणे किमान रु.५ ते १० लाखाचे संरक्षण प्रत्येक व्यक्तीचे असावे. यासाठी अल्पदरात सह्याद्री हॉस्पिटलची योजना आहे (ज्यात घरातील ४ व्यक्तीना वार्षीक रु.६०००/- भरुन रु.१० लाखापर्यंतचे उपचार मिळू शकतात. (अधिक माहितीसाठी मला संपर्क करु शकता). तसेच टर्म इंशुरन्स घेतानाच यासाठी स्वतंत्र रायडरव्दारे असा विमा थोडा अधिक हप्ता भरुन मिळू शकतो.
३) अपघात विमा: अपघात काही सांगून होत नाही म्हणून प्रत्येकाने हा अवश्य घ्यावा, अत्यंत कमी हप्ता भरुन अशा प्रकारचा विमा मिळतो.
४) कर्जफेडीचा विमा: जेव्हा आपण गृह कर्ज, वाहन कर्ज घेतो तेव्हा मुदतीपुर्वी कर्जदाराचा मृत्यु झाल्यास वारसाना उर्वरीत कर्जाचे हप्ते न भरता त्या मालमत्तेचा ताबा निर्वेधपणे मिळण्यासाठी या प्रकारचा विमा अवश्य घ्यावा. यासाठी कर्ज घेतानाच बँकेतच याबाबत चौकशी करावी.
५) कायमस्वरुपी अपंगत्व विमा: कोणत्याही कारणाने शारीरीक अपंगत्व आल्यास असा विमा उपयुक्त होतो. टर्म इंशुरन्स घेतानाच यासाठी स्वतंत्र रायडरव्दारे असा विमा थोडा अधिक हप्ता भरुन मिळू शकतो.
६) भविष्यातील विमा हप्ते माफ होण्याची सुविधा: टर्म इंशुरन्स घेतानाच यासाठी स्वतंत्र रायडरव्दारे असा विमा थोडा अधिक हप्ता भरुन मिळू शकतो ज्यामुळे कायम स्वरुपी अपंगत्व आल्यास पुढील हप्ते न भरताही जिवन विमा संरक्षण पुढे चालू राहते.
७) ट्रँव्हल इंशुरन्स: कोणत्याही सहलीला जाताना या प्रकारे विमा संरक्षण मिळू शकते.
८) इंकम रायडर: जिवन विम्यासोबत मिळू शकते, विमा धारकाचा मृत्यु झाल्यास वारसाला उर्वरीत मुदतीचे काळात विमा संरक्षणाचे १०% एवढी रक्कम दर वर्षी मिळत रहाते.
९) वाहन विमा: हा प्रत्येक वाहन मालकाला घेणे बंधनकारकच आहे.
१०) मालमत्त विमा: जसे कि घराचा विमा घेतल्यास दुर्दैवाने घराला कोणत्याही कारणाने धोका निर्माण झाल्यास झालेले नुकसान भरुन मिळते, ज्यामुळे नविन घर बांधणे सुलभ होते.
११) चोरीचा विमा: चोरीपासून झालेले नुकसान भरुन मिळते.
१२) फायर, फ्लड इ. विमा: आग, पुर इ. कारणामुळे झालेले नुकसान भरुन मिळते.
विमा घेताना काय काळजी घ्याल?
आजकाल अनेक विमा कंपन्या बाजारात कार्यरत आहेत म्हणून कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण घेताना उपलब्ध सारे पर्याय तपासून पहा.
१) ज्या कंपनीचा सर्वात कमी हप्ता असेल त्या कंपनीची विमा योजना निवडा.
२) विमा घेताना सर्व अटी समजून मगच विमा घ्या म्हणजे नंतर पस्तावण्याची वेळ येणार नाही.
३) क्लेमबाबत पुर्ण माहिती घ्या.
४) कोण कोणत्या बाबींसाठी क्लेम मिळणार आहे व कोणत्या कारणांमुळे तो मिळणार नाही हे चेक देण्यापुर्वीच तपासून पहा.
५) जिवन विमा घेताना फक्त टर्म इंशुरन्सचे माध्यमातूनच घ्या कारण जिवन विम्याचा हा सर्वाधिक स्वस्त पर्याय आहे.
६) विमा व गुंतवणूक यांची गल्लत करु नका.
७) विमा हे गुंतवणूकीचे साधन केव्हाही होत नाही.
८) विमा कंपन्यांचे पेंशन प्लान घेण्याऐवजी कोणत्याही गुंतवणूक साधनात गुंतवणूक नियमीतपणे करत रहा व निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम चांगल्या साधनात गुंतवून उर्वरीत आयुष्य सुखासमाधानात घालवा.
९) विमा हा तुमची गरज म्हणूनच घ्या, तुमचा मित्र, नातेवाईक, परिचीत विमा एजंट झालेला आहे म्हणून अजिबात घेऊ नका, त्याला अन्य प्रकारे मदत करा पण त्याच्याकडून कोणतीही विमा पॉलीसी घेऊन फसू नका.
१०) विमा एजंटमार्फत घेत असताना तो एजंट कायम स्वरुपी तुम्हाला सेवा देऊ शकेल याची खात्री करुन घ्या, शक्यतोवर तो हा व्यवसाय प्रामाणिकपणे व कायमस्वरुपी करणारा असावा.
११) कोणत्याही परिस्थितीत युलीपचा प्लान (ULIP V/s Mutual Fund) न घेणे हाच शहाणपणा आहे. याला उत्तम पर्याय म्हणजे दिर्घ मुदतीसाठी टर्म इंशुरन्स व म्युच्युअल फंडाचे कॉम्बीनेशन करा, तुमचा फायदाच होईल.
१२) आपल्या बचतीपैकी थोडी तरी रक्कम अवश्य म्युच्युअल फंडाचे एखाद्या चांगल्या समभाग योजनेत नियमीत दर महा जास्तीत जास्त काळासाठी गुंतवा, यातूनच संपत्ती निर्माण होईल, जी भविष्यातील तुमच्या अनेक गरजा पुर्ण करण्यास मदत करेल.